राष्‍ट्रगीत

जन-गण-मन अधिनायक जय हे

 भारत भाग्‍य विधाता l

पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा,

द्राविड़-उत्‍कल-बंग

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्‍छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे,

गाहे तव जय-गाथा 

जन-गण-मंगलदायक जय हे,

भारत भाग्‍य विधाता l

जय हे, जय हे, जय हे, 

जय जय जय, जय हे l

                                                                 

                                                                  (डॉ.रवींद्रनाथ टागोर) 

 रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्ये एक कविता लिहीली होती. या कवितेचं पहिलं पद म्हणजे भारताचं राष्ट्रगीत. टागोर यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती. ज्यात संस्कृत शब्दांचाही वापर करण्यात आला होता. 

'जन-गण-मन' हे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायलं गेलं.त्यानंतर २४ जानेवारी १९५० ला रवींद्रनाथ टागोर यांच्या या कवितेला अधिकृतरित्या भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं. राष्ट्रगीताचे बोल आणि संगीत टागोरांनी आंध्र प्रदेशच्या मदनापल्लीमध्ये (Mdanapalli) तयार केली होती.

राष्ट्रगीत म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे ,आपण दररोज परिपाठात तसेच  १५ ऑगस्ट,२६ जानेवारी आणि यासोबतच इतर अनेक प्रसंगांना राष्ट्रगीत गायलं जातं. 

पण राष्ट्रगीत गायनाचे काही मूलभूत नियम आहेत जे आपल्यापैकी अनेकांना माहित नसतील. एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत गायलं जाणार असेल तर त्याचा योग्य सन्मान होणं गरजेचं आहे.

५२ सेकंदांत गायलं जातं राष्ट्रगीत

संपूर्ण राष्ट्रगीत गायनासाठी ५२ सेकंदांचा वेळ लागतो. पहिलं आणि शेवटचं कडवं असलेलं राष्ट्रगीताचं संक्षिप्त रुप गायनासाठी २० सेकंदांचा वेळ लागतो. राष्ट्रगीत म्हणताना काही नियमाचं पालन करणं बंधनकारक आहे. जर कुणी या नियमांचं उल्लंघन करतं तर त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. यामध्ये एक नियम असाही आहे की, सिनेमा थिएटरमध्ये जेव्हा राष्ट्रगीत सुरू होईल तेव्हा उपस्थितांनी जागेवर उभं राहून राष्ट्रगीताचा मान राखणं अपेक्षित आहे.

संयुक्त राष्ट्र संघात घुमला ‘जन-गण-मन’चा आवाज

देश स्वातंत्र्य होत असताना १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पहिल्यांदा संविधान सभेची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाला ‘जन-गण-मन’ गायलं गेलं. 

१९४७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations) भारतीय प्रतिनिधी मंडळाला भारताच्या राष्ट्रगीताबाबत माहिती मागितली गेली. तेव्हा भारतीय मंडळाने ‘जन-गण-मन’ची रेकॉर्डिंग संयुक्त राष्ट्र संघाला दिली. 

त्यादिवशी संपूर्ण जगभरातून आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींसमोर भारताचं राष्ट्रगीत अभिमानाने वाजवलं गेलं. त्यावेळी सर्वांनी त्यांची प्रशंसा केली. 

या घटनेच्या तीन वर्षांनंतर २४ जानेवारी १९५० ला भारताच्या संविधानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सभा बोलवण्यात आली होती. या दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद  यांनी अधिकृतरित्या ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीत घोषित केलं.