भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
                                                                                       

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर

     जन्म - १४ एप्रिल १८९१ - महू 

     मृत्यू - ६ डिसेंबर १९५६ - दिल्ली 

     नाव - भीमराव रामजी आंबेडकर


भारताला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली होती. कित्येक देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. अनेक वीरांनी बलिदान दिलं. समाजसुधारणा, क्रांतिकार्य, राजकारण इत्यादी सर्व माध्यमातून लोक स्वातंत्र्यासाठी झटत होते. 

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं योगदान दिलं. देशात समता, बंधुता नांदावी म्हणून ते आयुष्यभर झटत होते. देशामधील जातीभेद नाहीसा व्हावा, दलित बांधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून डॉ. आंबेडकर शेवटपर्यंत लढले.

 देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची राज्यघटना बनवण्याची जबाबदारी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थपणे पेलली. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं.

भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यतेला थारा नाही. अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी अविरत धडपडणाऱ्या, झुंझार व्यक्तिमत्त्व असलेल्या महापुरुषाचे नाव होते-डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 

ते लहान पणापासूनच हुशार, बुद्धिमान होते. पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करून अमेरिकेला गेले. पुढे शाहू महाराजांच्या आर्थिक साहाय्याने लंडनला जाऊन बॅरिस्टर झाले. 

त्यानंतर प्रॅक्टिसच्या निमित्ताने त्यांचा समाजाशी घनिष्ठ संबंध आला, व त्यातूनच त्यांना जातीयतेच्या, भेदाभावाच्या रुक्ष कडा उठून दिसू लागल्या.

हरिजनांच्या उद्धारासाठी व अस्पृश्यतेच्या समूळ उच्चाटणासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशा प्रकारे असमानतेचा निषेध केला. मानवतेच्या हक्कासाठी, सर्व सामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले. अशा या महान दलितउद्धारकानेच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना 'भारतरत्न' किताबाने सन्मानित करण्यात आले.

  • 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा', असा संदेश त्यांनी जनतेला दिला.
  • १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे ५,००,००० अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
  • ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.